राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची बैठक मुंबईत संपन्न

04 Sep 2018 , 09:10:30 PM

देशात कला आणि सांस्कृतिक क्षेत्रावर हेत असलेले आघात पाहता देशातील आणि राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. भिमा-कोरेगाव येथे विचारवंतांनी परिषद घेतली त्यांना कशा तऱ्हेची वर्तणूक मिळत आहे, हे राज्य पाहत आहे. या सर्व आघातांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थपणे तोंड दिले पाहिजे तरच आपले जीवन सार्थ ठरेल. आपण धर्मनिरपेक्ष आहोत, अंधश्रद्धा विरोधी आहोत हे आपल्या कलेतून दिसलं पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी केले. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जाणकारांनी लिहिते झाले पाहिजे. त्याला प्रसिद्ध करून जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी आमची असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मानधन, आरक्षण, सवलती हे सारे आपले हक्क आहेत, त्यासाठी आपण लढा दिलाच पाहिजे. पण आगामी निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे सरकार यावे, यासाठी कलाकारांनी पक्षाचा प्रचार करावा, विचारांचा वारसा समाजात रुजवावा, असे आवाहन टकले यांनी बैठकीत केले.  

यावेळी बोलताना सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी ज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले. ज्येष्ठ कलाकारांना वृद्धाश्रमात शेवटचे दिवस काढले जातात. कलाकारांचे मानधन, ग्रामीण घरकुल योजनेत कलाकारांना आरक्षण, एसटी प्रवासात कलाकारांना सवलत, आरोग्य सेवेत कलाकारांना सवलत, विविध कला महोत्सव पुन्हा सुरू करणे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलाकारांचा समावेश अशा विविध मागण्या सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि सांस्कृतिक विभाग संचालक यांना निवेदन देऊन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे, मुंबई कार्याध्यक्ष श्रीपाद खानोलकर, शाहीर वामन घोरपडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित लेख