राष्ट्रवादीच्या रणरागिणींचा राम कदमांविरोधात एल्गार

05 Sep 2018 , 10:22:22 PM

भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत कदम यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलनही केले. दरम्यान राम कदम यांच्याविरोधात पोलीस एफआयआर दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व घाटकोपर पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले.

यावेळी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की या देशातील अनेक बलात्कारांच्या प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या बातम्या याआधीही प्रसिद्ध झाल्या आहेत. भाजपचे पदाधिकारी किती असभ्य आहेत हे या प्रकरणातून समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. या प्रकरणात ते राम कदम यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का, असा प्रश्न चव्हाण यांनी केला. राम कदम यांनी राजीनामा द्यायला हवा आणि सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमी आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार काहीच करत नाही मात्र बेताल वक्तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे लोक करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांनी दिली.

या आंदोलनामध्ये मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनिषा तुपे, जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियन, डॉ.सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ.रिना मोकल, स्वाती माने, युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख