मुख्यमंत्री राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत – नवाब मलिक

07 Sep 2018 , 05:38:10 PM

सरकार विरोधात जो बोलेल तो शहरी नक्षलवादी असे सरकारच ठरवत आहे. राजकीय हेतूने लोकांना अटक करत आहे. राज्याचे गृहखाते कशा पद्धतीने काम करत आहे हे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील अस्थिरतेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रावर आहे. १ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे दंगल घडली. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात भाजपच्या लोकांनी आरोप केले की, नक्षलवादी लोकांचा यात सहभाग होता म्हणून ही घटना घडली. एल्गार परिषदेचे आयोजन नक्षलवाद्यांनी केले होते असे भाजपतर्फे जागोजागी बिंबवले गेले. सरकार सर्वांनाच नक्षलवादी ठरवत असेल तर या एल्गार परिषदेचे निमंत्रक बी.जी.कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेतेही नक्षलवादी आहेत का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रभरातून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक केली गेली. पुणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांची कोर्टात रिमांड मागितली. रिमांड मागताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याचे कारण दिले गेले. हे कितपत खरे आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे असेही ते म्हणाले. पोलिसांकडे याबाबत माहिती उपलब्ध होती तर त्यांनी एन आय ए आणि इतर मुख्य संस्थांना याबाबत माहिती का दिली नाही? थेट कोर्टात कसे सांगितले? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. भाजप फर्जीपणा करत असून पोलीस यंत्रणेवर दबाव आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित लेख