५६ इंच छातीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस विचारत आहे जनतेच्या मनातील ५६ प्रश्न - नवाब मलिक

07 Sep 2018 , 08:09:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या जवाबदो आंदोलनाची माहिती दिली.

गेल्या चार वर्षांत जनतेला केवळ आश्वासनांवर खेळवत ठेवलेल्या सरकारबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खदखद आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे #जवाबदो हे ऑनलाईन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ५६ इंच छातीच्या सरकारला याद्वारे जनतेच्या मनातील ५६ प्रश्न विचारण्यात येत आहेत. ५ सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या फेसबुक व ट्विटर खात्यांवरून हे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जवाब दो मोहिमे अंतर्गत पहिला प्रश्न हा पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल विचारण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत वाढल्याने पेट्रोल-डिझेल महाग होत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली सांगतात. मात्र ही जनतेची दिशाभूल आहे. वास्तवात केंद्र व राज्य सरकार तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेची लूट करत आहे, असा थेट आरोप मलिक यांनी केला. केंद्र सरकारकडून लावण्यात येत असलेली एक्साइस ड्युटी व राज्य सरकारच्या अवास्तव सेसमुळे पेट्रोल-डिझेलची किंमत आटोक्यात येत नाही, असे ते म्हणाले. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर याबाबत जीएसटी काऊंसिलचे बहुमत असायला हवे, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार असताना जीएसटी काउंसिलमध्ये पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास बहुमत का मिळत नाही, असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

नेटकऱ्यांनी #जवाबदो हॅशटॅग वापरून या मोहिमेला प्रतिसाद द्यावा आणि आपले प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सरकारला विचारावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित लेख