चुकीला माफी नाही ! नवाब मलिकांची राम कदमांवर कारवाईची मागणी

07 Sep 2018 , 09:43:26 PM

भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली असली तरी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सरकार किती वाल्याचा वाल्मिकी करणार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की राम कदम यांच्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. राम कदम यांनी काल माफी मागितल्याचे समजते मात्र आता माफी मागून उपयोग नाही त्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. गुन्हा केला आहे तर गुन्हा दाखल व्हायला हवा असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांनी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर काल दिवसभर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांना सर्व माहिती दिली पण अद्यापही पोलिसांनी राम कदम यांच्यावर एफआयआर दाखल केला नाही. महिलांचे अजूनही आंदोलन सुरू आहे. कदम यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जर पोलिसांनी राम कदम यांना अटक करता येत नसेल तर आमच्या महिलांना अटक करा अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

राज्यात ८०० मुली बेपत्ता आहेत. पोलिसांना त्याचा शोध घेता येत नाही. त्यात आमदार असे बेताल वक्तव्य करत आहे. राम कदम यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आम्ही येत्या अधिवेशनात करणार आहोत अशी मागणी त्यांनी पत्रकारांना दिली. तसेच गंभीर प्रकार असून अद्यापही राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही बहादूर लोकांची फौज तयार करून त्यांना मोकाट सोडले आहे. मुख्यमंत्री राम कदम यांना वाचवण्यासाठी दबाव टाकत आहेत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख