पंतप्रधान महोदय ! मौन सोडून उत्तर द्या – सुप्रिया सुळे

15 Sep 2018 , 07:38:01 PM

हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडून उत्तर द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया खा. सुळे यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी नेहमी महिलांच्या सुरक्षेबाबत बोलतात, मात्र त्यांच्या कृतीतून काही दिसत नाही अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातही बेपत्ता मुलींची संख्या वाढत आहे. याबात चिंता व्यक्त करत सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असून मुख्यमंत्री त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत तरी असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, ही गंभीर बाब असल्याचे सुळे म्हणाल्या.

दरम्यान, हरियाणाच्या रेवाडी येथे ही बलात्काराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सीबीएसई बोर्डात टॉप केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या तरुणीचा सन्मान करण्यात आला होता. पीडित तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पंतप्रधान म्हणतात, ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ? असा संतप्त सवाल तरुणीच्या आईने विचारला आहे.

संबंधित लेख