असंघटीत कामगार सेलची बैठक मुंबईत संपन्न

26 Sep 2018 , 12:27:52 AM

मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे असंघटीत कामगार सेलची बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

असंघटित कामगारांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मुंडे यांनी दिली. असंघटित कामगारांवर राज्यभरात अन्याय होत आहे. ऊसतोड कामगारही एका प्रकारे असंघटित कामगार आहेत, त्यांनाही न्याय मिळत नाही. सरकारतर्फे त्यांची पिळवणूक होत आहे. लोकांच्या मनात याबाबत राग आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर लोकांची प्रचंड नाराजी आहे, असे मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मोठी कामगार ताकद आहे. या कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच न्याय देईल, अशी खात्री मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य देशाला प्रेरणा देणारे राज्य आहे. असंघटित कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. या असंघटित कामगारांची हाक ऐकणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब! पवार साहेबांनी नेहमी कामगारांना न्याय दिला आहे. त्यांच्यासाठी निर्णय घेतले आहेत, कायदे बनवले आहेत, असे प्रतिपादन आ. शशिकांत शिंदे यांनी केले. कामगार कायदा शाबूत राहणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्यातून पळवाट काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे कामगारांनी लढाई सुरू ठेवावी, तुम्हाला एकटं पडू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटीत कामगार सेलचे राज्यप्रमुख रावसाहेब दारकोंडे, सेलचे सदस्य व असंघटीत कामगार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख