राज्यातील महिलांच्या दुरावस्थेला भाजप सरकार जबाबदार – विद्या चव्हाण

26 Sep 2018 , 12:36:20 AM

कर्जासाठी महाराष्ट्रात शीलाचा सौदा होतोय. तोही बळीराजाच्या पत्नीचा.
होय, बँक कर्मचारी कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेत उघड उघड शेतकऱ्यांच्या पत्नींकडे निर्लज्जपणे शरीरसुखाची मागणी करू लागले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातली दुसरी व लागोपाठ तिसरी घटना उघडकीस आली आहे.
बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या धामणगांव बढे शाखेत ही लांछनास्पद घटना घडली. सुधाकर देशमुख या कर्मचार्याहला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यवतमाळ येथील दारव्हा तालुक्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत सहकारी सोसायटीच्या सचिवाने दुग्ध उत्पादनाशी निगडित कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. ही घटना जुलै महिन्यातली.

त्याआधी जून महिन्यात बुलडाण्यातच मलकापूर तालुक्यात दाताळा गावातील घटनेत सेंट्रल बँकेच्या राजेश हिवसे या शाखाधिकाऱ्याला याच अश्लाघ्य मागणीसाठी अटक झाली होती.

आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता हे आणखी संकट घोंघावत आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत याचा आणखी एक पुरावा. शेतकऱ्यांची पत्नी कठीण परिस्थितीतही आत्महत्येचा मार्ग पत्करत नाही असा विश्वास होता. पण वारंवार अशा घटना सर्रास घडू लागल्या तर ती वेळही दूर नाही. कारण कायदा-सुव्यवस्थेचा वचक पूर्णपणे नाहिसा झाला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आ. विद्याताई चव्हाण यांनी या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध केला असून राज्याचे मुख्यमंत्री जबाबदारी टाळत असल्याचा आरोप केला आहे. महिलांच्या या अवस्थेला भाजपाचे सरकार जबाबदार असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल त्यांनी उद्विग्नपणे विचारलाय.

संबंधित लेख