राष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख राज्याच्या दौऱ्यावर

26 Sep 2018 , 06:36:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा एकदा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनतेच्या बाजूने मैदानात उतरत असून २६ सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पाचही विभागात फ्रंटल आणि सेलच्या राज्यप्रमुखांचे दौरे सुरु होत आहेत. या दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारच्या शेतकरी आणि जनताविरोधी धोरणांबाबत व चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवणार आहे.

डिसेंबर २०१७ पासून सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोलच्या माध्यमातून सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाय अधिवेशनाच्या काळातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेचे जनतेने स्वागतच केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलचे प्रमुख सरकारवर हल्लाबोल करणार आहेत.

उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर-कोकण विभाग, पुणे जिल्हा, विदर्भ, मराठवाडा या विभागात फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख दौरे करणार आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ  या २६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात सरकारच्याविरोधात रान उठवणार आहेत तर कोल्हापूर आणि कोकण विभागात सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड हे ८ ऑक्टोबरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे  हे १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक हे २ ते १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती, युवक आणि विद्यार्थी प्रमुखांचेही दौरे २६ सप्टेंबरपासून सुरु होत असून युवती प्रदेशाध्यक्ष कुमारी सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील  आणि विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील  हे तिघेही राज्यभर दौरे करणार आहेत. युवती प्रदेशाध्यक्ष कुमारी सक्षणा सलगर या ६ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा विभाग तर युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हेही ३ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा पिंजून काढणार आहेत. तसेच विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील हे ९ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा पाढा वाचणार आहेत. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना निष्क्रिय सरकारविरोधी लढण्यासाठी एक नवी उर्मी मिळणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आता सगळयांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित लेख