मोदी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी पहिलं पाऊल शेतकरीच उचलणार - जयंत पाटील

02 Oct 2018 , 08:48:47 PM

दिल्लीत मोर्चा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांवर केंद्रशासित दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केला. सरकारच्या या दडपशाहीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. देशात सरकारने कुठल्याही भागात हमीभाव दिलेला नाही, दिल्या फक्त घोषणा आणि मृगजळासारखी आश्वासनं...  मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले, आज तेच शेतकरी द्वेषाने गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीत जाऊन सरकारला जाब विचारत आहेत. त्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी त्यांच्यावर अश्रूधूर, लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्याने त्यांना थोपवण्याचं पाप भाजप सरकार करतंय, अशा शब्दांत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट वाढेल आणि त्या प्रमाणात आम्ही आधारभूत किमती देऊ, असं या सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं. देशातील शेतकऱ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र विश्वासघात झाल्याने चिडलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असता केंद्रशासित दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला  आणि त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. आता भारतातला शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या दडपशाहीला घाबरणार नाही. मोदी सरकारला दूर करण्यासाठी पहिलं पाऊल शेतकऱ्यांकडूनच उचलण्यात येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख