चित्रा वाघ वसई जवळील खेड्यातील आदिवासी महिला व विद्यार्थ्यांच्या भेटीला

09 Feb 2016 , 02:31:36 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी खोलांडे या वसईनजिकच्या छोट्या गावाला भेट देऊन तिथल्या कष्टकरी आदिवासी महिला आणि शाळकरी मुलांशी संवाद साधला. सुमारे हजार-बाराशे वस्ती असलेल्या खोलांडे या आदिवासी गावातील लहान मुलांमध्ये असलेले कलागुण पाहून अक्षरशः थक्क व्हायला झाले, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. या मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांना चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी वसईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  

"वसई-विरार महानगरपालिकेचा भाग असूनही दुर्लक्षित असलेल्या खोलांडे गावातील वाड्या-वस्त्यांमधील मुलांमध्ये किती सुप्त गुण लपलेले असतात हे त्यांनी काढलेल्या सुंदर, कल्पक रांगोळ्यांमधून त्यांनी सादर केलेल्या गीतांमधून तसेच नृत्यांमधून दिसून आले," असे कौतुकपर उद्गार चित्रा वाघ यांनी काढले. वीज कपातीचा सामना कराव्या लागणाऱ्या गावात कुपोषित मुलांचे वजन पहाण्याकरिता वीजेवर चालणारा वजन काटा बघून नक्कीच आश्चर्य वाटले, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

राष्ट्रवादीच्या वसईतील कार्यकर्त्या अश्विनी गुरव यांच्यानिमित्ताने या गावाला भेट देण्याची आणि येथील महिला व लहानग्या मुलामुलींशी गप्पा मारण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या छोटेखानी कार्यक्रमाला रेखाताई पाष्टे, मनिषा उके,राजाराम मुळीक,रत्नदिप बने हेदेखील उपस्थित होते. 

संबंधित लेख