पाचोरा येथे समाजातील महत्त्वाच्या घटकांसोबत खा. सुप्रिया सुळे यांचा संवाद

16 Oct 2018 , 07:23:51 PM

पाचोरा तालुक्यातील व्यापारी, डॉक्टर्स, शिक्षक, अभियंते, वकील, शिक्षक या समाजातील महत्त्वाच्या घटकांसोबत खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विविध अडचणींवर मोकळेपणाने बोलतानाच त्यावर तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यावरही चर्चा करण्यात आली.

आजवर या समाज घटकांनी कधी आंदोलन केलेले पाहिले नाही, मात्र आज डॉक्टर्स, वकील, व्यापारी सगळेच रस्त्यावर उतरत आहेत, याबाबत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली. सरकारतर्फे नवनवीन बिलं पास केली जात आहेत मात्र त्यातून उद्भवणाऱ्या समस्याही मोठ्या प्रमाणावर आहे, असे त्या म्हणाल्या. डॉक्टर्सच्या संघटना आता कमी होत चालल्या आहेत, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

ऑनलाईन औषधविक्री करण्याची मुभा सरकारने दिली, मात्र त्याचा गैरवापर होईल त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्यापारी वर्गाला जीएसटीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक समस्या याठिकाणी चर्चेला आल्या. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही काय करू शकतो याचा विचार करता येईल, म्हणूनच हे प्रश्न इथे मांडा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले. तुमच्या हक्काचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे त्या म्हणाल्या.

पक्षाच्या वतीने आम्ही प्रत्येक ठिकाणी लोकांच्या समस्या समजून घेण्याचे काम करत आहोत. गावापासून जिल्ह्यांपर्यंत या गोष्टी विचारात घेतल्या जातात. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, अत्याचार, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, असे अनेक प्रश्न विचारात घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही पण ज्या प्राथमिक गरजा आहे त्या सोडवणे प्राधान्य आहे, असेे मत त्यांनी मांडले. माझ्या मतदारसंघात आंगणवाडीला वीज व पाणी पुरवठा देण्याचे काम आम्ही केले आहे. गरीब जनतेची मुले अांगणवाडीत जातात त्यांना काहीच कमी पडू नये, याची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे असंवेदनशील सरकार आहे. मुली उचलण्याची, मुलीचे नाव दारुच्या बाटलीला देण्याची भाषा करणाऱ्या यांच्या नेत्यांना काय म्हणायचे. हे सरकार आल्यापासून आपल्या जीवनात एखादा चांगला बदल झाला का, याचे उत्तर कोणाकडे आहे का, असा प्रश्न त्यांनी सर्वांना विचारला. गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, महिला असुरक्षितता असे कितीतरी प्रश्न समोर असल्याचे त्या म्हणाल्या. आज राज्यात दुष्काळाचे सावट असताना देखील मुख्यमंत्री म्हणतात की पाणी कमी आहे म्हणजेच दुष्काळ नाही. यांच्या मताने दुष्काळ म्हणजे काय हे यांनी स्पष्ट करावे, असे त्या म्हणाल्या.

सरकारने प्लास्टिक बंदी केली परंतु हा निर्णय अचानक घेण्यात आला हे चुकीचे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे त्या म्हणाल्या. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याकरिता पक्षाच्या डॉक्टर्स सेलच्या वतीने जनजागृती करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जीएसटीच्या बाबतीत जीएसटी कॉंसिलसोबत बोलण्याची गरज आहे. ती पक्षाच्या वतीने करण्यात यावी. अशी मागणी व्यापारी वर्गाकडून यावेळी करण्यात आली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, कार्याध्यक्ष विलासदादा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीवदादा देशमुख, अनिल भाईदास पाटील, गटनेते संजय वाघ हे उपस्थित होते.

संबंधित लेख