चंद्रकांत दादा, ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करण्याचा कोणता मुहूर्त आहे? - जयंत पाटील

23 Oct 2018 , 09:21:13 PM

राज्यात ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात दिली. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ३१ ऑक्टोबर रोजी कोणता मुहूर्त आहे, असा संतप्त सवाल सरकारला विचारला आहे. भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केला जात आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलने केली जात आहेत. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. ३१ ऑक्टोबरला राज्यातील फडणवीस सरकारला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना, असेही ते म्हणाले. राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना या सर्वच योजना उघड्या पडल्या आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. सरकारचे हे अपयश आहे असेही ते म्हणाले. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता पण महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. भाजपला लोकांची काहीच चिंता नाही भाजपला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.

संबंधित लेख