छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू केल्याचे दाखवून लोकांची दिशाभूल – नवाब मलिक

24 Oct 2018 , 07:54:39 PM

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू करत असल्याची घोषणा करण्यात आली. ही लोकांची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नाही. कंत्राटदार केवळ काम सुरू केल्याचे दाखवून लोकांच्या नजरेत धूळफेक करत आहेत, असे मलिक म्हणाले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे जलपूजन केले होते, मात्र त्यानंतर काहीही काम झाले नाही. आता निवडणुका जवळ आल्यानंतर काहीतरी करतोय असे दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याची टीका मलिक यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतही तेच झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ३८ हजार कोटींची कर्जमाफी या सरकारने जाहीर केली मात्र अद्याप १६ हजार शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ पोहोचलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख