मुंबई मनपाच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्यांनी अजितदादांविषयी बोलू नये – आ. विद्या चव्हाण

29 Oct 2018 , 08:56:50 PM

राजकारणाचे आणि सभ्यतेचे तारतम्य सोडत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यावर अत्यंत हीन भाषेत टीका केली गेली. शिवसेनेच्या या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी निषेध केला आहे. शिवसेना स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारात बरबटलेली आहे. मराठी माणसांना आणि मुंबईकरांना मूर्ख बनवण्याचे काम शिवसेना करत आहे, अशा लोकांनी अजित पवार यांच्या विषयी बोलू नये असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, सामनाचे अग्रलेख हे कार्यकारी संपादक संजय राऊत लिहीत असतात. संजय राऊत हे लोकप्रतिनिधी आहेत आणि पत्रकार आहेत पण या अग्रलेखाच्या माध्यामातून त्यांनी त्यांची मर्यादा दाखवली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि एका कर्तृत्ववान नेत्याबाबत काय बोलायचे हे त्यांना कळत नाही. याआधीही महाराष्ट्रातील जाणकार लोकांना यांनी नावं ठेवली आहेत. त्यांच्याकडून सुसंस्कृतपणा अपेक्षित नाही. शिवसेनेला आता प्रबोधनकार यांच्या वारशाचा लवलेशही उरला नाही अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. गेली २५ वर्षे शिवसेना मुंबई महानगरपालिकेत आहे, मात्र त्यांनी मुंबईच्या समस्या काही सोडवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आधी अजित पवार यांनी अजित पवार यांनी सत्तेत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा केलेला विकास बघावा, असे त्या म्हणाल्या.

शिवसेनेने आतापर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावर उड्या मारल्या आहेत. शिवसेना आता भाजपच्या हातचं बाहुलं झाली आहे. शिवसेनेच्या लोकांची अजित पवार यांच्याबाबत बोलण्याची लायकी नाही, अशी टीका शिवसेनेच्या नेतृत्वाबाबत बोलताना विद्या चव्हाण यांनी केली.
संबंधित लेख