राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन

29 Oct 2018 , 11:38:50 PM

देशातील संविधान संकटात आले असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या दरम्यान आज पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

आज देशाच्या संविधानावर तसेच देशावर जे संकट आले आहे. राज्य कुणाचंही असो पण त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी व्हायला हवा. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच लोक संविधानावर हल्ले करत आहेत, असा आरोप खा. शरद पवार यांनी केला. निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी यासाठी सीबीआय असते. सीबीआय एक स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र त्याच्या प्रमुखांना घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांमार्फत घेण्यात आला. याने स्पष्ट होते की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा या सरकारचा कारभार आहे. सरकारचा हा कारभार देशासाठी घातक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही. केरळमध्ये सबरीमाला नावाचे मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मंदिरात रजस्वला स्त्रीयांना प्रवेशबंदी होती. काही स्थानिक महिलांनी याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आणि प्रवेशबंदी उठवली. या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहभाग असलेल्या केरळ सरकारने पुढाकार घेतला. मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शाह तिथे गेले आणि सांगितले की सुप्रीम कोर्ट असं निर्णय कसं घेऊ शकतं. अमित शाह यांनी घेतलेल्या ता भूमिकेमुळे स्पष्ट होते की न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय यांना मान्य नाही. स्त्रीपुरुष समानता यांना मान्य नाही. असे विचार असणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता असणे धोकादायक आहे, असेही ते म्हणाले.

आज स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. सरकार काहीच करत नाही. आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकार करत आहे, ही चिंतेची बाब आहे. आज राज्यावर दुष्काळी संकट आले आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. शेकडो भगिनींना उन्हातान्हात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. सर्व घटकांना दुष्काळाचा फटका बसतो मात्र महिलांना त्याची झळ जास्त बसते. सरकार अनुकूल निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले की चारा छावण्या देणार नाही. आघाडी सरकार असताना आपण लागेल ती मदत शेतकऱ्यांना केली होती मात्र हे सरकार तसं करताना दिसत नाही, असेही पवार म्हणाले. चारा नाही, पाणी नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत, सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार सामान्य माणसाला कोणतेही सहाय्य करत नाही. अशा लोकांकडे असलेली सत्ता आपण लोकशाही मार्गाने हिसकावून घ्यायलाच हवी, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुढचे काही महिने अडचणीचे आहे. आपण या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे सरकार उदासीन आहे म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. सणासुदीची वेळ आहे, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा असे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्हाला स्वायत्तता नाही. जर न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य नसेल तर मग देशात लोकशाही कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सरकार आल्यापासून आरबीआयने आपली स्वायत्तता गमावली. निवडणूक आयोगाने स्वायत्तता गमावली आहे. मीडियाला स्वातंत्र्य राहिले नाही. सरकार सर्वच गोष्टीत ढवळाढवळ करत आहे. सरकार धनतंत्र, दबावतंत्र या गोष्टींचा वापर करतं तेव्हा लोकशाही धोक्यात येते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जेव्हा मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारखे लोक देशाच्या तिजोरीतील पैसे चोरून घेऊन जातात तेव्हा देशातील चौकीदारावर प्रश्न निर्माण होण्यास वाव आहे, असे त्या म्हणाल्या. ही कदाचित देशातील शेवटची निवडणूक आहे. जर हेच लोक पुन्हा निवडून आले तर देशात हिटलरशाही येईल. लोकशाही पूर्णतः संपेल. लोकशाही टिकविण्यासाठी या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

लोकांना कळू लागले आहे की हे सरकार फक्त स्वतःच्या सोयीसाठी सर्व निर्णय घेत आहेत. त्यांना गरज पडली तर ते संविधानाच्या कलमांत बदलही करत आहेत. आज देशात मनुवादी प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. आपण यांना वेळीच रोखले पाहिजे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआयचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी करत आहे. सीबीआयप्रमुख ऐकत नाहीत म्हणून रातोरात त्यांची बदली केली जाते. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. विराट कोहलीने शंभर धावा केल्या तर मोदी त्यावर ट्विट करतात मात्र महिलांवरील अत्याचाराबाबत काहीच बोलत नाही, असा आक्षेप त्यांनी व्यक्त केला.

तर आमदार विद्या चव्हाण देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यापासून देशात आणि राज्यात एक अस्थिरता निर्माण झाली आहे, असे मत व्यक्त केले. भाजपचे एक आमदार म्हणतात की देशावर ब्राह्मणांचे वर्चस्व असेल म्हणजे यांच्या डोक्यातून जातीव्यवस्था आजही जात नाही. नरेंद्र मोदी म्हणजे देशात असलेला दहा तोंडी रावण. या रावणाला आपल्याला रोखावंच लागेल. देश संकटात आहे देशाला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख