राष्ट्रवादी अपयशी भाजप सरकारच्या गाथा राज्यातील प्रत्येक गावात पोहचवणार - नवाब मलिक

30 Oct 2018 , 12:10:18 AM

भाजप सरकार चार वर्षांची विकासयात्रा काढत आहे, परंतु आम्ही भाजप सरकार चार वर्षांत कसे अपयशी ठरले आहे हे सांगणार,शिवाय १ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात जाऊन घोंगडी बैठका घेऊन सरकारच्या अपयशाच्या गाथा पुस्तकाच्या रुपात जनतेपर्यंत पोचवणार असल्याची माहिती देतानाच चार वर्षात भाजप-शिवसेनेच्या सरकारने जनतेला कशा पध्दतीने फसवले आहे, याचा पाढाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये वाचला.


३१ ऑक्टोबरला भाजप-सेनेच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन ‘ही कसली प्रगती, ही तर अधोगती’... ‘असुरक्षित, अर्थशून्य, अशांत, असहाय्य महाराष्ट्र’ नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेमध्ये अपयशी सरकारची चार वर्षे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.


कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी उपाय नाही असा विचार हे सरकार करते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी सरकारवर टीका केली. पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाची भूमिका त्यांनी मांडली. पक्षाच्या वतीने गेली चार वर्षे या सरकारच्या अपयशाची गाथा देशासमोर घेऊन जाण्याचे काम सुरु होणार आहे. पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन बैठक घेतली जाईल व त्यामध्ये हे सरकार अपयशी कसे ठरले याची जनजागृती करण्यात येईल. सत्तेवर येण्याआधी ज्या घोषणा या सरकारने केल्या त्या यांना पूर्ण करता आल्या नाहीत, असे मलिक यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा आकडा १० हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या सरकारवर ३०२ चे कलम लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा असा आक्रोश पाहून सरकारने कर्जमाफी जाहीर केली, असे मलिक म्हणाले. ३४-३८ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती त्यातील फक्त १६ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. ७९ लाख शेतकाऱ्यांना कर्जमाफी देऊ पण त्यापैकी फक्त २९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. ७-१२ कोरा करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांचा आकडा दिसत नाही का, अशी टीका त्यांनी केली.

राधामोहन सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हमीभाव वाढवण्याचा विषय जनतेसमोर ठेवला आहे. पण जो हमीभाव सांगण्यात येतो त्याने व्यवहार होत नाही हा विचार सरकार करते का, असे ते म्हणाले. हमीभाव द्यायचा असेल तर त्यांनी जागोजागी हमीभाव केंद्र उभारावी. जलयुक्त शिवार योजनेसाठी ७ हजार कोटी खर्च करून राज्य जलयुक्त झाले का, हा प्रश्न नवाब मलिक यांनी सरकारला विचारला आहे. याकरिता या योजनेची माहिती सरकारने जनतेला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अशा सर्व योजनांमधून हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.

मॅग्नेटिक सिटीमध्ये २ लाख लोकांना रोजगार मिळाले असे या सरकारने जाहीर केले परंतू याउलट घडले आहे. देशात अस्तित्वात असलेले कारखानेच बंद होत आहेत. याचे कारण या भाजप सरकारची गुंडगिरी आहे, असे ते म्हणाले. माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी गोळा करण्याचे काम या सरकारकडून होत आहे. शिर्डीमध्ये मोदींनी घरकूल योजनेचा विषय मांडला. परंतु एकीकडे मुंबई शहरात रस्तारुंदी, गटाररुंदी अशा प्रश्नांसाठी ९० हजार झोपड्या तोडण्याचे काम हेच सरकार करत आहे. यांच्याजवळ पुनर्वसनासाठी जागाच शिल्लक नाही तर या लोकांना घरे कुठे बांधून देणार हा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. या घरकूल योजनेंतर्गत ८५ हजार लोकांना बेघर करण्याचे काम हे सरकार करत आहे.

महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ३६ हजार महिला बेपत्ता आहेत याचे उत्तर सरकारने द्यावे. काही महिन्यांपूर्वी आयुषमान भारत योजना जाहीर केली. यात ७ कोटी लाभार्थींची संख्या ४० लाखांवर आणून ठेवली आहे, याचे उत्तरदेखील मुख्यमंत्र्यांनी द्यावे. महाराष्ट्रात असुरक्षितता व अशांतीचे चित्र आहे. त्यात कर्ज घेऊन टक्केवारीने देण्याचा धंदा या सरकारमध्ये होत आहे. बांधकाम विभागात अनेक घोटाळे होत आहेत. मुंबईतील धारावीत परदेशी कंपनीला कंत्राट देण्याचे काम या सरकारने केले आहे. दुबईच्या एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. भाजप सरकारच्या विकास यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान मराठवाड्यात काही मंत्री विकास यात्रेच्या नावाखाली रात्रीच्या वेळी शेतीच्या कामांची पाहणी करतात याचा काय अर्थ घ्यावा असा प्रश्न नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत सरकारला केला आहे.

संबंधित लेख