विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली एस. टी. कामगार संघटनेच्या आंदोलनकर्त्यांची भेट

30 Oct 2018 , 10:27:55 PM

मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी आमदार अशोक धात्रक तसेच पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या वेतनवाढीबाबतची कोंडी दूर करण्यात यावी, शिवशाही एसटी भाड्याने न घेता एसटीने विकत घ्यावी, कंत्राटीकरण व खासगीकरण बंद करण्यात यावे, असुधारित वेतन गृहीत धरून १०००० उत्सव अग्रीम द्यावे, आकसपूर्वक कारवाया थांबवून जटील परिपत्रके रद्द करावी तसेच महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ४८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक घोषणा केली. मला वाटलं की एसटी कामगारांचे प्रश्न सुटले. पण मनात एक शंकाही होती कारण हे सरकार फक्त घोषणाच करते. ज्यावेळी हे सरकार ऐतिहासिक हा शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होणार हे जगजाहीर झालेलं आहे. ऐतिहासिक कर्जमाफी फसवी निघाली, रावते यांची ४८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक घोषणादेखील घोषणाच निघाली, अशी टीका मुंडे यांनी केली.

काल एका वृत्तवाहिनीवर रायझिंग महाराष्ट्र हा कार्यक्रम घेतला गेला. या सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्र बुडत आहे आणि रायझिंग महाराष्ट्रसारखे कार्यक्रम काय घेताय, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात दिवाकर रावते भाषण करत असताना मला हसू येत होतं. निव्वळ फेकाफेक सुरू होती आणि नंतर माझं भाषण होतं म्हणून मला हसू आवरत नव्हतं, असेही त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. हे सरकार एसटी महामंडळासह महाराष्ट्राला विकायला निघाले आहे. या सरकारला लवकरच उलथून लावण्याची गरज आहे, असेही मुंडे म्हणाले. रावते साहेब दिलेले आश्वासन पाळा, नाहीतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे तुमचेही आडनाव बदलायला वेळ लागणार नाही. असाही या सरकारचा फार काळ उरला नाही. जाताजाता काही चांगले काम करून जा दिलेले आश्वासन पाळा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

या संघटनेचे सर्व प्रश्न नक्कीच मार्गी लागतील कारण या संघटनेमागे आदरणीय शरद पवार साहेब उभे आहेत, असे सांगतानाच ४८४९ कोटी रुपये आम्ही घेऊनच राहू नाहीतर येणारे अधिवेशन आम्ही चालू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिवशाहीच्या माध्यमातून खासगीकरण एसटीमध्ये आले. सरकार शिवशाहीच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांची आणि ग्राहकांची फसवणूक करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो आता यांची घंटी वाजवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन सचिन अहिर यांनी केले. आम्ही कधीही कामगारांची संघटना मोडण्याचा प्रयत्न केला नाही. एसटी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सदैव उभे राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख