मुंबई मनपातील सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडचे पाणी पळवले – राखी जाधव

02 Nov 2018 , 09:50:44 PM

मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात राबवल्या जाणाऱ्या ३० टक्के पाणीकपातीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थायी समितीच्या बैठकीत सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांना शहरातील पाण्याचे नियोजन करता येत नाही, मुंबई मनपातील सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडचे पाणी पळवले, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या  राखी जाधव यांनी यावेळी दिली.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव भरले असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात पेढे वाटले मग आता ऑक्टोबरमध्ये पालिकेवर पाणीकपात करण्याची नामुष्की का ओढवली, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांच्या या पाणीकपातीचा फटका थेट मुंबईतील गरीब जनतेला बसत आहे, महानगरपालिकेला पाणीकपात करायचीच असेल तर मोठे मॉल्स, मोठ्या इमारतींमध्ये असलेले स्वीमिंग पूल येथे पाणीकपात करावी.

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना जाधव म्हणाल्या की सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहे. खरंतर त्यांना पाण्याचे नियोजन करता आलेच नाही. सत्तेतील लोकांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितले होते की शहराला २४ तास पाणी दिले जाईल, सत्ताधाऱ्यांनी आपला शब्द पाळावा अन्यथा २०१९ साली जनता मतपेटीतून आपले मत व्यक्त करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित लेख