राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कागलमध्ये भीक मांगो आंदोलन

10 Feb 2016 , 01:40:50 PM

कागलच्या महसूल विभागाची दादागिरी मुळासकट उपटून टाकणार - हसन मुश्रीफ 

राज्यातील भाजप सरकार वेगवेगळे कर आणि दंड आकारणी करून समाजातील कष्टकरी घटकांची आर्थिक पिळवणूक करत आहे. गोरगरिबांसाठीच्या सेवासुविधा एकीकडे बंद करत असतानाच दुसरीकडे सरकार ठरवून दुर्बल घटकांकडून करवसुली करत आहे. याच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 'भीक मांगो' आंदोलन करण्यात आले. कागलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेद्वारे सामान्य लोकांवर सुरू केलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, प्रशासनाची वसुलीची ही दादागिरी मुळासकट उपटून टाकू,  असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. सरकारला भीकेचे डोहाळे लागले आहेत, या शब्दात त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. 

कागलमधील गैबी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत रस्त्यावर भीक मागत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला. भीक मागून आणलेल्या रकमेची खोकी नायब तहसीलदार सरस्वती पाटील व शिवाजीराव गवळी यांच्याकडे देण्यात दिली. या आंदोलनाला कागलमधील व्यापाऱ्यांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मंगळवारी कागलमधील व्यापारी कडकडीत बंद पाळून आंदेलनात सहभागी झाले. 

गेले दोन महिने भाजप शासन आर्थिक आघाडीवर डळमळत आहे. नोकरांचे पगार वेळेवर देऊ शकत नसल्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडून महसूल विभागामार्फत पैसे गोळा केले जात आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली. कागल तालुक्यातून पाच कोटींचा महसूल जमवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून वाळू, दगड, खडी काढणारे, बांधकाम करणारे यांना रात्री-अपरात्री पकडून दंड वसूल केला जात आहे. अकृषक कराच्या नावाखाली व्यापार्यां वरही दंड आकारला जात आहे. म्हणून कागल बंद ठेवून हे आंदोलन आम्ही केले, हा प्रकार त्वरित थांबवला जावा अन्यथा जनतेचा मोठा उद्रेक होईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्रकाश गाडेकर, शिवानंद माळी, संजय हेगडे यांनीदेखील आपला निषेध भाषणांद्वारे नोंदवला. 


संबंधित लेख