राष्ट्रवादीच्या अर्बन सेलची कोल्हापूर शहरात बैठक

25 Feb 2019 , 12:41:09 PM

आज कोल्हापूर येथे पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यावसायीक, व्यापारी व तसेच पत्रकार यांच्या सोबत बैठका पार पडल्या. केंद्र सरकारने मांडलेली स्मार्ट सिटी संकल्पना मुळातच बोगस आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरांतील पायाभूत सुविधांचा विकास रखडला आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याची लोकसहभागातून अंमलबाजवणी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या #अर्बनसेल च्या बैठकीत कोल्हापूर शहरात रविवारी करण्यात आला. कोल्हापूरच्या महापौर सरीता मोरे,आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक ,अर्बन सेल चे सरचिटणीस सुरेश पाटील,पक्षाचे शहराध्यक्ष आर.के.पोवार तसेच अदिल फरास, अनिल साळुंके, संगीता खाडे, जहिता मुजावर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्बन सेलच्या अध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. 


शहराच्या विकास प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. शहराचे प्रश्‍न समजावून घेवून नागरिकांच्या मदतीने ते सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रसंगी राज्य, केंद्र सरकारशी संघर्ष करावा लागला तरी, त्यासाठी नागरिकांना उद्युक्त करणे गरजेचे आहे. शहरातंर्गत सार्वजनिक वाहतूक सक्षम करायला पाहिजे. त्यासाठीचा आराखडा निश्‍चित केला जाईल. तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया यांचाही समावेश त्यात असेल. शहराच्या विकास आराखड्यातील ओपन स्पेसेस (खुल्या जागा) महत्त्वाच्या आहेत. पुढील पिढीच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी त्या उपयुक्त ठरू शकतात. नदी, तलाव, नाले यांचे संवर्धन करून ते जतन करणे गरजेचे आहे. त्यांची स्वच्छता राखली तर प्रदूषण नियंत्रित होऊ शकते, असेही या बैठकीत ठरले. 

जीएसटी मुळे महापालिकेचे अर्थिक स्रोत कमी झाले आहेत. त्यासाठी या पुढील काळात नवे स्त्रोत निर्माण करून विकास कामाला निधी उपलब्ध करावा लागेल. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छतेकडे आपल्याला सातत्याने लक्ष द्यायला हवे. महिलांचा आर्थिक व सर्वांगिण विकास करण्यासाठी, त्यांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी शहरे महिलाभिमुख तयार करावी लागतील. यासाठी पुढाकार घेत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात यावी, असेही बैठकीत ठरले. मानवी जीवनासाठी विकासाची शाश्‍वत मूल्ये संयुक्त राष्ट्रसंघाने तयारी केली आहेत. राष्ट्रसंघाचा सदस्य म्हणून भारतानेही शाश्‍वत विकास मूल्ये मान्य केली आहेत. या पुढील काळात त्यांचा पाठपुरावा त्यांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करण्यावरही या बैठकीत एकमत झाले.

संबंधित लेख