मोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवा – धनंजय मुंडे

11 Feb 2016 , 05:06:56 PM


सध्या मेक इन इंडियाची मुंबईत जोरात चर्चा सरू असून त्याच्या उदघाटनाला पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. यावेळी मोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच मोदींना 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवाव्या, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर आज सोडले. मुख्यमंत्रांना दुष्काळाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. दुष्काळ निवारणासाठी एका महिन्याच्या आत औरंगाबादला मंत्र्यांची बैठक घेऊ, असे आश्वासन गेल्या वर्षी ११ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आठ महिने होऊन गेले तरी अजून बैठक झाली नाही. एकाही पालकमंत्र्यांनी गेल्या आठ महिन्यात एकदाही जिल्ह्याची दुष्काळ निवारण बैठक घेतलेली नाही. राज्य सरकारला दुष्काळाचे गांभीर्य आहे का, याचा जाब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला आहे. पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, आणि क्लाइड क्रास्टो उपस्थित होते.

राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सुप्रिम कोर्टाने याची गंभीर दखल घेतली आहे पण सरकार मात्र सत्य माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतोय. लातूरला २० दिवसांनी,  बीडला १५ आणि परभणीला ८ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय. ग्रामीण भागात तर यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. चारा पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. भीषण दुष्काळ असतानाही मराठवाड्यात बाटलीबंद पाणी विकले जात असून पाणी माफिया जनतेची लूट करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारला या परिस्थितीची जाणीव आहे का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. 

तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता योजनेबाबत बोलताना,सरकारने या योजनेबाबत घुमजाव केले असून आमचा त्यावर विश्वास नाही, असं मुंडे म्हणाले. सरकारला या योजनेच्या संत गाडगेबाबांच्या नावाची अडचण दिसते आहे, त्यांना संघाच्या कुणा नेत्याचे नाव द्यायचे आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारी आणि लोकसहभागातून थेट युनोपर्यंत लौकिक मिळवलेली योजना सरकार बंद करते आहे, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने अमलबजावणी केली नाही म्हणून योजना बंद करत आहोत, हा सरकारचा युक्तिवाद हास्यास्पद आहे. सरकारची प्रशासनावर पकड नसल्याचेच यातून स्पष्ट होते, असे ते पुढे म्हणाले. भंपक आणि तथाकथित चमत्कारिक बुवा-बाबांच्या नादी लागण्यापेक्षा सरकारने खरे संत असणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांची आणि कृतींची कास धरावी, असे वक्तव्य मुंडे यांनी केले.  

दरम्यान, आजच्या इशरत जहाँच्या विषया संदर्भात बोलताना, राष्ट्रवादी कोणत्याही दहशतवादी व्यक्तीला पाठिशी घालणार नाही. इशरत जहाँचे कुटुंबीय न्यायालयात तिला निर्दोष दाखवण्यासाठी लढाई लढत आहेत. जर ती दहशतवादी होती तर तिचा खोटा एनकाऊंटर का केला गेला, तिच्याकडे अशी कोणती माहिती होती जी गुजरात सरकारला लपवायची होती, हे प्रश्न अनुत्तरित आहेत, अशी प्रतिक्रया पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.


संबंधित लेख