राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे सरकारविरोधात घंटानाद आंदोलन

12 Jun 2019 , 07:16:38 PM

राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असताना अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ कशी होत आहे? याचे उत्तर सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नाही. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटा अडकवून घंटानाद करु, असा इशाराही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्ष सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, अनिता किणे, राधाबाई जाधवर, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घंटानाद तसेच थाळीनाद करण्यात आला. या आंदोलनात  युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विजया दामले, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, अनिता मोठे, पूनम वालिया, स्मिता पारकर, कांता गजमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, गीता शिंदे, भानुपती पाटील, इंदू भोसले, सुविणा भिलारे, पुजा जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

संबंधित लेख