सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन...

19 Jun 2019 , 08:04:01 PM

पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. परंतु अर्थसंकल्प सादर होतानाच तो अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समोर आणला, त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून अर्थसंकल्प फुटल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. याशिवाय राज्यातील गंभीर दुष्काळ आणि सरकार करत असलेले दुर्लक्ष किंवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह इतर मुद्दयांवरही राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्यां वर उतरुन आंदोलन केले.
विरोधी पक्षाचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे आगमन झाले. त्यावेळी 'नाथाभाऊंना डावलणा-या सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी पुढे येवून एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत हस्तांदोलन केले.

संबंधित लेख