नाशिक विमानतळाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विमानतळ असे नामकरण करावे

16 Mar 2020 , 04:49:55 PMमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस यावर्षी ६० वर्षे पूर्व होत आहेत. सन १९६० मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. सन १९६२ मध्ये चिनी आक्रमणानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली. संरक्षणमंत्री म्हणून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सहा महिन्यांच्या आत लोकसभा किंवा राज्यसभेत सदस्य म्हणून निवडून येणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी स्व. चव्हाण साहेबांनी ही पोटनिवडणूक नाशिक लोकसभा मतदार संघातून लढविण्याचे नक्की केले. चव्हाण साहेब देशाचे संरक्षण मंत्री होणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याने या निवडणुकीत चव्हाण साहेबांची लोकसभेत बिनविरोध निवड झाली. संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चव्हाण साहेबांनी नाशिक येथे हिंदुस्थान एरोनॉटीक्सच्या निमित्ताने विमान निर्मितीचा मोठा कारखाना उभा करून दिला. नाशिकचे नाव त्यामुळे जगाच्या नकाशावर दिमाखाने घेण्यात आले. त्यामुळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण म्हणून नाशिक विमानतळाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विमानतळ असे नामकरण करावे, दिनांक १२ मार्च या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर करून केंद्राकडे शिफारस करावी, ही स्वर्गीय चव्हाण साहेबांना आदरांजली ठरेल, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार हेमंत टकले यांनी आज औचित्याचा मुद्दा मांडून केली.

संबंधित लेख