हात जोडून विनंती आहे, टोकाचे पाऊल उचलायला लावू नका.

26 Mar 2020 , 12:49:59 PM


माझी मुंबईकरांसह महाराष्ट्रवासीयांना हात जोडून विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलायला लावू नका. भाजी मंडईत गर्दी करू नका, कृपा करून अफवा पसरवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेला पुनश्च केले आहे. मुंबईत अजूनही लोक राज्य सरकारच्या आवाहनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. दादर परिसरातही मी बघितले लोक गर्दी करत आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आता हा आकडा १०१ वर गेला आहे. कालच साताऱ्यात एक जण आढळला. नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी, असेही अजितदादा पवार म्हणाले. आज सकाळी त्यांनी वार्ताहारांना याबाबतची माहिती दिली.

मास्क, सॅनिटायझर यांच्या साठेबाजीबद्दल पवार म्हणाले की, साठेबाजी करू नका, जे असे करतील त्यांच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई करू. आता ३१ मार्चपर्यंत भाजीपाला उपलब्ध होणार नाही अशा अफवा पसरत आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कारण, पुणे, पिंपरी-चिंचवडच्या भाजीमंडईत पुढचे चार दिवस पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भाजीपाला मिळेल परंतु त्याठिकाणी गर्दी करू नका. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरू ठेवण्यास सांगण्यात आलेल आहे. तेवढ्या वेळेतच लोकांनी भाजी खरेदी करावी आणि आपापल्या घरी जावे असे आवाहनही त्यांनी केले.

व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबद्दल अजितदादा म्हणाले की, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याबरोबर मी, मा. बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव यांनी चर्चा केली. राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टरांना पुरेसे मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होत नाहीत याबद्दलही काळजी घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. आजपासून रोज सकाळी साडेदहा वाजता मुख्य सचिवांसोबत बैठक होईल आणि राज्यातील परिस्थितीबद्दलचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले. राज्यात येणारे ट्रक सरसकट अडवले जात आहेत. त्यात भाजीपाला किंवा अत्यावश्यक सेवाही असू शकतात. याबाबत वाहतुक पोलिसांमध्ये संभ्रम आहे. याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख