कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई – उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार

26 Mar 2020 , 01:12:17 PM

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून करण्यात आलेले आवाहन काही नागरिक गांभीर्याने घेत नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी म्हटले आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे आणि घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोना विषाणू पसरण्याचा धोका वाढला आहे. आतापर्यंत राज्य शासनाने संयमाने घेतले. परंतु हा संयम यापुढे कायम ठेवणे शक्य नाही. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्यात येत आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचे, निर्बंधांचे पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे, असे अजितदादांनी सांगितले. तसेच जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे आपली जबाबदारी पार पाडणारे आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज संस्था आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अजितदादांनी अभिनंदन केले.

या सर्वांची मेहनत राज्यशासन वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख