लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

09 Apr 2020 , 12:09:55 PM


राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेचे अत्यावश्यक सामान, औषधे, सॅनिटायझर, मास्क इ. बाजारात उपलब्ध होतील. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही व मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण (Thalassemia) व कर्करुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू देणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

औषध प्रसाशन विभागाने दि. २४ मार्च रोजी रक्तपेढी प्रतिनिधी, तज्ज्ञ, बीटीओ (B.T.O.) व प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. या ग्रुपवर राज्यातील प्रत्येक रक्तपेढीने त्यांच्याकडील रक्ताच्या उपलब्धते बाबतची माहिती दिल्यानंतर ती माहिती एकत्रितरित्या संकलित करण्यात येत आहे. माहिती गोळा केली आहे. तसेच रक्ताच्या युनिट उपलब्धतेची व वितरणाची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत रक्ताचा तुटवडा होणार नाही, यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी येण्यात अडचणी येणार नाहीत, यासाठी पोलीस व जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक सहकार्य प्राप्त करण्यासाठी कळवण्यात आले आहे. त्यानुसार व्हॉटसअप ग्रुपवर रक्तपेढीकडून अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे. रक्तपेढ्यांकडे पुढील २० दिवस रक्त पुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील औषधे उत्पादकांना कच्चा माल, पॅकींग मटेरिअल, कामगारांचा तुटवडा, वाहतूक व्यवस्थेत व्यवधान होणार नाही तसेच जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी वेळोवेळी मंत्रालय आणि प्रशासनस्तरावर बैठका आयोजित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. जनतेला त्यांच्या तक्रारी प्रशासनाकडे तात्काळ नोंदविणे शक्य होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत व सचिव स्तरावरून बैठक आयोजित करून दि. २५ मार्चपासून प्रशासनाच्या मुख्यालयात २४ X ७ तास कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.


संबंधित लेख