अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रकमेचे वितरण - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती

25 Apr 2020 , 12:15:03 PMकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहे. ग्रामविकास विभागाचे कर्मचारी म्हणजे या विषाणुच्या विरोधात लढणारे योद्धेच आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

संबंधित लेख