रायगड, रत्नागिरीतील निसर्ग चक्रीवादळ बाधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचे मोफत वाटप – ना.छगन भुजबळ

15 Jun 2020 , 10:11:46 AM

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून विविध स्तरावर मदत करण्यात येत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य प्राप्त झाले आहे व त्याचे वाटपही सुरु करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारकांना तर रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ हजार ५२६ शिधापत्रिकाधारकांना या मोफत धान्याचा लाभ देण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांनी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी आपद्ग्रस्त भागातून पवार साहेबांनी दूरध्वनीद्वारे ना. छगन भुजबळ यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. त्यानंतर ना. छगन भुजबळ यांनी या भागात तातडीने अन्नधान्याचे वाटप करण्याचे आदेश दिले असून या भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्य वाटप सुरु करण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने नागरिकांना दिव्यांचा वापर करता यावा म्हणून ५ लिटर मोफत केरोसिनचे वाटप यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

संबंधित लेख