लॉकडाऊनच्या काळात अन्न,नागरी पुरवठा विभागाचा अन्न धान्य वाटपात विक्रम – ना. - छगन भुजबळ

15 Jun 2020 , 10:24:46 AM



राज्यात एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल
मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप
६२ लाख ८४ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

कोविड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने अन्न, धान्य वाटपात विक्रम नोंदविला आहे. एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले आहे तर १ एप्रिल ते ५ जून पर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली

सामान्य परिस्थतीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरीत केले जाते. मात्र एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लक्ष १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे. मे आणि जून मध्ये केशरी कार्ड धारकांना देखील अतिरिक्त १ लाख ५० हजार क्विंटल धान्य वाटप जात असल्याने मे महिन्यात ७६ लक्ष ८३ हजार क्विंटल धान्य वितरीत करण्यात आले आहे.

शिवाय कोरोनाच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून योग्य नियोजनाद्वारे राज्यातील गोर गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

तसेत कोरोना कालावधीत शिवभोजन थाळीच्या संख्येत ५० हजारांची वाढ करण्यात आल्यामुळे राज्यात आता दररोज ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळीचे वितरण होत आहे. राज्यात एप्रिल महिन्यात ७७२ केंद्रांमधून २३ लाख ९९ हजार ७३७ शिवभोजन थाळ्या, मे महिन्यात ८३८ केंद्रांमधून ३३ लाख ८४ हजार ०४० शिवभोजन थाळ्या तर जून महिन्यात दि.१ ते ५ जून पर्यंत ८३८ केंद्रांमधून ५ लाख ६३६ शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आल्याची माहिती ना. छगन भुजबळ यांनी दिली.

संबंधित लेख