ई-संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप कार्यान्वित होणार महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

15 Jun 2020 , 10:29:54 AM



कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेक खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे लोकांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ते कार्यान्वित झाल्यानंतर यासेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येऊ शकेल. राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी केलेय.

या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांच्या सहाय्याने आजारावर सल्ला मसलत करू शकतो. या सेवेचे मोबाईल ॲप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल तसेच विशेषज्ञांच्या सेवांसाठी विशीष्ट वेळ देखील दिली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णांकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते. राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित लेख