कोविड काळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे बाधित, उपेक्षित घटक व आरोग्यसेवकांसाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचा मदतनिधी

02 Jul 2020 , 04:23:04 AM


कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी आज मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हाच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट उभारण्याचे काम देखील झाले. या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यात आपत्ती आल्यास त्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आतापर्यंत ज्यांनी या ट्रस्टला मदत केली अशा सर्वांचे मनस्वी आभार मानतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणतीही आपत्ती ही काही काळापुरती मर्यादित असते. परंतु कोविड हा आजार पाहिला तर या आजाराचा मागील तीन महिन्यांपासून प्रादुर्भाव असून जनतेने राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमांचे नियमांचे पालन केले नाही तर फार मोठी किंमत सर्वांना मोजावी लागेल, त्यामुळे प्रत्येकाने शासनाला सहकार्य करत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आले आहे तेव्हा विविध राज्यांमध्ये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदत करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी दिली. गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूर याठिकाणी भीषण महापूर आला होता. त्यावेळीही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने मदत केलेली आहे. हे कार्य सातत्याने सुरू असून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे व तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत जाण्याचा ट्रस्टचा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात तमाशातील संगीतबारीतील अनेक कलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांना मदतीची नितांत आवश्यकता होती. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे ३५०० हून अधिक लोककलावंताच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक रुपये ३००० इतकी रक्कम थेट जमा करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे लोककलावंतांसाठी आतापर्यंत रुपये १,०६,०५,००० इतका निधी वितरित झाला आहे. या गरजू लोककलावंतांपर्यंत मदत पोहचवण्याच्या कामी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मोठे योगदान दिले आहे.
तसेच गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत अथकपणे डॉक्टर्स, परिचारिका, आशा सेविका, वॉर्डबाइज हे कोविडयोद्धे कोरोना विषाणूंशी दोन हात करत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने या फ्रंटलाइनर कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण सव्वादोन लाख फेस शील्डचे वाटप करण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी दिला गेला. तसेच ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी निर्देश दिल्याने ग्रामविकास विभागाने दूरस्थ ग्रामीण भागात आरोग्यसेवेचं कार्य करणाऱ्या ६० हजार आशा सेविकांपर्यंत ही फेस शील्ड पोहचवण्यात मोलाची मदत केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
रंगभूमीवर बॅकस्टेजला काम करणाऱ्या रंगमंच कामगारांवरही कोविड लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने बेरोजगारीची वेळ आली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व संलग्न संस्थांच्या सहकार्याने गरजू १५०० रंगमंच कामगारांपैकी आतापर्यंत १२५० हून अधिक रंगमंच कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी रुपये २५०० प्रमाणे ३१ लाख ५० हजार रुपयांचा निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे जमा करण्यात आल्याचे जयंत पाटील म्हणाले.
याच दरम्यान निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला. या वादळात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील किनाऱ्यालगतच्या गावांतील घरांचे व बागांचे अपरिमित नुकसान झाले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे खासदार सुनिल तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सहयोगाने आपद्ग्रस्त गावांमधील घरांसाठी ५० लाख रुपये किमतीचे सुमारे ५ हजार लोखंडी पत्रे व दीड हजार ढापे उपलब्ध करवून दिले दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्था म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आपले मदतकार्य यापुढेही करत राहणार आहे. या सगळ्या मदतकार्यात अनेक दात्यांनी राष्ट्रवादी वेल्फेअरला सढळ हस्ते मदत केली. आतापर्यंत अनेकांनी या ट्रस्टसाठी आर्थिक सहाय्य केलेले आहे. कोरोनाचं संकट खूप मोठे असल्यामुळे आणखी काम करण्यासाठी लोकांनी ट्रस्टला सढळ हस्ते अर्थसहाय्य करावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अशा भावना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. मागच्या काळात अजित दादांनी रंगभूमीला ५ कोटी रुपयांची मदत केली होती. अशीच मदत या संकटकाळातही करावी, अशी विनंतीही शरद पोंक्षे यांनी अजित पवार यांना यावेळी केली.
राज्यातील तमाशा लोककलावंत लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. या वर्गाची अडचण लक्षात घेऊन तब्बल पाच हजार कलावंतांच्या खात्यावर ३००० रूपयांप्रमाणे दीड कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सांगितले. या वर्गातील दीड लाख लोकांचा हा प्रश्न असून हा प्रश्न सरकारपुढे मांडल्याबद्दल लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे आभार मानले.
महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेन्स डॉक्टर्सच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्सना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. १५ ते १७ हजार फेसशिल्डच्या माध्यमातून या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी मदत मिळाली. अत्यंत उपयुक्त अशा या फेसशिल्ड आहेत. या मदतीबद्दल मार्डचे प्रतिनिधी डॉ. दीपक मुंडे यांनी ट्रस्टचे आभार मानले.
तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कडून जी वैद्यकीय साधनांची मदत करण्यात आली त्याचा फायदा इंडीयन मेडीकल असोसिएशनलाही झाला. उपयुक्त सामग्री नसल्याने डॉक्टर्स आपले दवाखाने सुरू करत नव्हते. मात्र ट्रस्टने केलेल्या मदतीने डॉक्टर्सना धीर मिळाला व पुढील संक्रमण होण्यास आळा बसल्याचे आयएमएचे प्रतिनिधी डॉ. संतोष कदम यांनी सांगितले आणि ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला खा. सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, अल्पसंख्याक विकास मंत्री ना. नवाब मलिक, कोषाध्यक्ष व माजी आ. हेमंत टकले देखील उपस्थित होते.

संबंधित लेख