जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन काटेकोरपणे करा - उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

12 Sep 2020 , 09:31:18 AM


जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांच्या मनात विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहचवण्यात वा उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
पुण्यातील विधानभवनाच्या सभागृहात ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थिती जाणून घेण्यासाठीची आढावा बैठक झाली. या बैठकीदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातून कोरोनाबाधित रुग्ण पुण्यातील जम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाबाबतची परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन सर्व प्रकारे सहकार्य करत असून दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाने देखील सक्रीयपणे काम करावे, असे ते म्हणाले.
पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतिमानता येण्याच्या दृष्टीने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे, असे त्यांनी सांगितले. विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, ऑक्सिजन टँकरचा वाहतुकीदरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्सप्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील,याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

संबंधित लेख