शेतकरी आणि गुराढोरांसकट जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल मोर्चा'!

17 Feb 2016 , 01:51:23 PM

उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही या जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढील दोन दिवसात उस्मानाबाद,लातूर आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनजंय मुंडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी केली. या मोर्चात शेतकऱ्यांसह त्यांची गुरे ढोरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. त्याचवेळी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या आत्तापर्यंत सुरू होत्या. पण अशा वेळी अचानक चारा उपलब्ध असल्याचा साक्षात्कार सरकारला झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. रब्बीचे पीकच या जिल्ह्यात झाले नाही तर चारा कुठून उपलब्ध होणार असा प्रश्नही त्यांनी केला. सप्टेंबर महिन्यातच ९ लाख मेट्रीक टन चाऱ्याची कमतरता होती. त्यात आत्ता चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय म्हणजे 'ना बुड, ना शेंडा' अशा पद्धतीचा असल्याचेही ते म्हणाले. 

हा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना आणखीन संकटात टाकले आहे.  सरकारमधील मंत्र्यांनी आपल्या बरोबर या जिल्ह्यांचा दौरा करावा आणि चारा आहे की नाही याची पहाणी करावी. चारा उपलब्ध असल्यास सरकार सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.

संबंधित लेख