बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात कोरोनाबधित महिलेची यशस्वी प्रसुती

12 Sep 2020 , 09:37:25 AM


कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धे आपल्या अपरिमित सेवेचे आणि माणुसकीचे वेळोवळी दर्शन घडवत आहेत. असेच एक उदाहरण बारामती येथे घडले. बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका कोरोनाबधित गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केली. या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिची प्रसूती करणे अतिशय जिकरीचे काम होते. परंतु, बारामतीच्या महिला शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ही किमया करून दाखवली. कोरोना काळात सर्वच शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात असतानाही बारामतीच्या डॉक्टरांनी संबंधित महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्वरित शस्त्रक्रिया करून महिलेला आणि तिच्या बाळाला जीवदान दिले.
बाळाभोवती नाळेचा तिढा असल्याने बाळ गुदमरण्याची शक्यता होती. त्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. महिला कोरोनाबधित असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका होता. त्यामुळे तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचे ठरले होते. पण बाळाची स्थिती पाहून शासकीय रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. बारामतीतील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. आशिष जळक, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, डॉ. सचिन थोरवे, भूलतज्ज्ञ डॉ. सुमित जाधवर, महिला परिचारिका अमरजा मार्डीकर, सोनाली, शस्त्रक्रिया कक्षातील तांत्रिक गणेश लोखंडे यांनी हे आव्हान पेलले.
रुग्णालयात तात्पुरता शस्त्रक्रिया कक्ष तयार करण्यात आला. सर्वजण पीपीई किट घालून शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाले आणि कोरोनाबधित महिलेची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कोणत्याही शासकीय रुग्णालयात आम्हाला असा सुखद अनुभव आला नाही, या शस्त्रक्रियेनंतर शासकीय रुग्णालयाबाबतच्या आमच्या सर्व कल्पनाच बदलून गेल्याची प्रतिक्रिया महिलेच्या कुटुंबीयांनी दिली आणि डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित लेख