कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई - उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

30 Sep 2020 , 02:04:05 PM

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई
माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा
- उपमुख्यमंत्री ना. अजित पवार
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाचे दर यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी आज दिला. माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहीमेअंतर्गत कोरोनाचे निदान होऊन वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
ना. अजित पवार यांनी आज पुणे, पिंपरी चिंचवड महानगरांसह पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता उपचारांसाठीच्या सुविधाही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित लेख