राजकारण हे बेरजेचे करायचे, वजाबाकीचे नाही - प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील

01 Oct 2020 , 05:25:45 AM


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर अनेक मान्यवर लोकांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे वजाबाकी भागाकाराचे नाही, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत, असे पाटील म्हणाले. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या लोकांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. राजकारणात संख्येला मोठे महत्त्व आहे. संख्याबळ मोठे असेल तर पक्षाची अधिक प्रगती होत असते, असे मत पाटील यांनी मांडले.
कार्यकर्त्यांची इच्छा नेत्याने आपल्याशी आपुलकीने व प्रेमाने बोलावे अशी असते आणि राज्यात कार्यकर्त्याला संवेदनात्मक व सन्मानजनक वागणूक देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पक्ष नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यामागे आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. रमेश कदम यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला बळकटी येईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरेदेखील उपस्थित होते. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले आहे. काही कारणांमुळे मधल्या काळात त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये रमेश कदम यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात पक्षाच्या मजबुतीसाठी आता त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरवात करू, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपा पक्षातून उस्मान मोमीन व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोमीन या सर्वांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.शेखर निकम, सरचिटणीस बसवराज पाटील, माजी. आ. संजय कदम तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख