महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

26 Oct 2020 , 12:23:54 PM

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर आणि आपल्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, खासदार प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे. आज महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, अशी भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शऱद पवार साहेब यांनी खडसे यांचे पक्षात स्वागत केले. खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी एकनाथ खडसे जोमाने काम करतील, असा विश्वासही आदरणीय पवार साहेबांनी व्यक्त केला.
सबंध महाराष्ट्रातील संघटनेचा विचार केल्यास नवी पिढी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहे, असे दिसते. दिवसेंदिवस पक्षाची शक्ती वाढत आहे. पण कोणत्या भागात पक्षसंघटनेचे काम अधिक जोमाने वाढायला हवे, असा विचार केल्यास खान्देशचा भाग नजरेसमोर येतो. आपले अनेक सहकारी या भागात काम करत आहेत आणि आता पक्षबांधणीला खऱ्या अर्थाने गती यायची असेल तर आज नाथाभाऊंच्या पक्षात येण्याने ती गती येईल यात शंका नाही. नाथाभाऊंच्या प्रयत्नांनी जळगाव जिल्हा हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने चालेल, असा विश्वास पवार साहेबांनी व्यक्त केला.
नाथाभाऊंनी पक्षात येताना सामान्य माणसाशी बांधिलकी जपण्याची भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटना काम करतेय. त्याला नाथाभाऊंची जोड मिळाल्यास प्रत्येक सामान्य माणसासाठी काम करण्यास पक्षास बळकटी मिळेल. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडल्यावर पक्षाच्या सर्व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन जळगावमध्ये आपण एक भव्य शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण करू आणि पुन्हा एकदा नाथाभाऊ यांची ताकद सबंध महाराष्ट्राला दाखवू, असा निर्धार पवार साहेबांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी आपले विचार व्यक्त केले. भाजपा पक्षाच्या उभारणीपासून 40 वर्षे पक्षासाठी अविरत काम केले, कधी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभेत माझी छळवणूक झाली, मानहानी झाली, माझी बदानामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी वारंवार विधानसभेत विचारलं की माझा गुन्हा काय, मी जर काही गैरव्यवहार असेल तर कागदपत्र दाखवा, पण अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. मी खूप संघर्ष केला. मंत्रिमंडळात येण्यासाठी देखील संघर्ष केला. 1991 पासून ते 2014 पर्यत दहा निवडणुका झाल्या, त्यामध्ये खान्देशातून 20 खासदारांपैकी 17 खासदार आम्ही नेहमी निवडून दिले. मी समोरासमोर लढाई करून निवडून आलो आहे. मी कोणाच्याही पाठीत कधी खंजीर खुपसला नाही. 40 वर्ष राजकारण केले पण कधी सूडाचे राजकारण केले नाही, अशी उद्विग्नता नाथाभाऊंनी यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्यासोबत पक्षप्रवेशाबाबत चर्चा करत असताना ते म्हणाले होते की, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, पण जर त्यांनी ईडी मागे लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेन, असा टोला खडसे यांनी यावेळी लगावला. भाजपामध्ये मला पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पक्षासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, लोकांनी तिरस्कार केला तरी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. मी शरद पवार साहेबांना शब्द देतो की जेवढ्या निष्ठेने भाजपामध्ये काम केले तेवढ्याच निष्ठेने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करेन. माझ्यासहीत असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपा पार्टी विस्तारली आणि वाढली, त्याच्या दुप्पट वेगाने मी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवून दाखवेन, अशी ग्वाही खडसे यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीचे बळ वाढवण्याच्या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करेन आणि त्याचे सकारात्मक परिणाम वर्षभराच्या आत नक्कीच दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील म्हणाले की, "एकनाथ खडसे साहेबांची कारकीर्द महाराष्ट्राने पाहिली आहे, पण गेल्या चार- पाच वर्षांत अशा काही घटना घडल्या की पहिल्या रांगेत असलेल्या या नेत्याला जाणीवपूर्वक कट-कारस्थानं करून सभागृहात मागच्या रांगेमध्ये नेऊन बसवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले. खडसे साहेबांवर जो अन्याय झाला त्याबाबत विधानसभेत मी प्रश्न विचारला होता की, कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा? आजही त्या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला मिळालेले नाही. पण त्यांना आज कळलं असेल की 'टायगर अभी जिंदा है' आणि पिक्चर अभी बाकी है!"
महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नव्हते. तशी महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधी पक्षात असलो तरी राज्याचे प्रश्न सोडवणे, एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका नेत्यांनी घेतली आहे. पण असे कपटी राजकारण महाराष्ट्राने मागील काही वर्षांत पाहिले. पण पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आदरणीय पवार साहेबांचा विचारच जनता स्वीकारेल हा विश्वास आम्हाला होता तो खरा ठरला, असेही पाटील म्हणाले. खडसे साहेबांचे आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज विशेष आनंद झालेला आहे. पूर्ण विचारांती आज खडसे साहेबांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. भविष्यकाळात फक्त जळगाव जिल्हा किंवा खान्देशातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी, हा पक्ष ताकदीने पुढे नेण्यासाठी खडसे साहेब भरीव योगदान करतील, त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्हाला सगळ्यांना होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांनी व्यक्त केला.
गेल्या 40 वर्षांपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उत्तम कार्य एकनाथ खडसे साहेबांनी केले आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याने अतिशय आनंद होत असल्याचे वक्तव्य माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले. विकासाची दृष्टी असलेले, मातीतले, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, प्रशासनावर वचक असणारे असे खडसे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे. पण ज्यांनी हजारो लोकांना न्याय मिळवून दिला त्यांच्यावरच भाजपात अन्याय झाला, असे गुजराथी म्हणाले. आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या द्रष्ट्या नेतृत्वामध्ये खडसे साहेब अधिक मोठे होतील आणि खडसे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होईल, असे सागतानाच आता जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे किमान पाच ते सहा आमदार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास यावेळी अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला. खडसे साहेब उत्तर महाराष्ट्रात नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या संगमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल बळकट करतील, असेही गुजराथी यावेळी म्हणाले.

संबंधित लेख