महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 'कोरोना' रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा - उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

26 Oct 2020 , 12:40:44 PM


'महात्मा फुले जन आरोग्य योजनें'तर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी आज दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'कोविड-19' विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप, ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा, मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेऊन सतर्क राहावे, अशा अनेक सूचना ना. अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

संबंधित लेख