'मेक इन इंडिया'तील किती टक्के गुंतवणूक विदर्भ, मराठवाड्याला?- जयंत पाटील

18 Feb 2016 , 07:07:44 PM


'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून ९ लाख ९४ हजार कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्या पैकी किती टक्के गुंतवणूक विदर्भ आणि मराठवाड्यात करणार आहात अशी विचारणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.  मुंबई, पुणे अणि नाशिक या भागांतच ही गुंतवणूक जाईल अशी भीतीही यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. सर्व गुंतवणूक  विदर्भ आणि मराठवाड्यात केली जावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 आघाडी सरकारने समतोल विकास साधला असतानाही आमच्यावर विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केल्याची टीका भाजपकडून वारंवार होत असे. आज राज्य सरकार 'मेक इन इंडिया'तून ९ लाख ९४ हजार कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचा दावा करत आहे. ही गुंतवणूक सरकारने विदर्भात करावी. शिवाय त्यातील किती टक्के मराठवाड्याच्या वाट्याला येणार तेही सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. 

'मेक इन इंडिया' मध्ये अवघ्या चार दिवसांत २५९५  सामंजस्य करार केल्याचा दावा सरकार करत आहे. हे प्रत्यक्षात शक्य आहे का? असा प्रश्न पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 'आमच्या माहितीप्रमाणे  इतक्या मोठ्या प्रमाणात करार होणे शक्य नाही, कारण प्रत्येक कंपनी अणि त्यांचा उद्योग याची चाचपणी करण्यासाठी बराच अवधी लागतो, असा आमचा अनुभव आहे' असे जयंत पाटील यांनी म्हटले.


शिव स्मारकाला गती देण्यास सरकार अपयशी 

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिव स्मारकाच्या कामाला गती देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळात स्मारक समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असताना अनेक कामे मार्गी लावली होती. निवडणुकीपूर्वी स्मारकाचे भूमिपूजनही करण्याचे ठरले होते. असे असताना या सरकारला ते करणेही शक्य झालेले नाही अशी टीका त्यांनी केली. शिवस्मारकाचा आरखडा आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आला. शिवाय अरबी समुद्रात संबधीत जागाही शोधून काढण्यात आली. पर्यावरण विषयक परवानगी शेवटच्या टप्प्यात होती. असे असताना नव्या सरकारने स्मारताच्या कामाला गती देणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसले नाही. स्मारकासाठी कन्सल्टंट नेमण्यात आले आहेत. त्यामुळे स्मारकाच्या कामाला सध्या तरी गती मिळणार नाही अशी भिती त्यांनी व्यक्त केली. मागील शिवजयंतीला स्मारकाचे भूमिपूजन होईल असे सांगितले होते, पण ते झाले नाही असे  ते म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, संजय तटकरे आणि क्लाइड क्रास्टो उपस्थित होते.

संबंधित लेख