परळी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना धनंजय मुंडेंच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप

18 Feb 2016 , 07:53:16 PM

परळी तालुक्यातील मागील एक वर्षात आत्महत्या केलेल्या २६ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ११ हजार रूपये आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी त्यांना मदत करा अशी सूचना मुंडे यांनी त्यांच्या ताब्यातील परळी कृषी उत्पन्न बाजार समितीला केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे सभापती पंडितअण्णा मुंडे यांच्यासह संचालक संजय दौंड तसेच तहसिलदार विद्याचरण  कडवकर उपस्थित होते.

"महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकरी हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ घोषणाबाजीचे काम सरकार राज्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या  आर्थिक व्यवहारांशी निगडीत असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचे धोरण या सरकारने अवलंबिले असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे," असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. मात्र याच वेळी शेतकऱ्यांनी खचून न जाता खंबीरपणे या दुर्दैवी परिस्थितीचा सामना करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आपण स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.  

दरम्यान, धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने २४ एप्रिल रोजी परळी येथे भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील उपवर वधु-वरांचे विवाह प्राधान्याने लावले जाणार आहेत. 

संबंधित लेख