मागासवर्गीयांना आरक्षण मिळू नये हाच 'आरएसएस'चा अजेंडा - नवाब मलिक

23 Feb 2016 , 05:26:34 PM

'आरक्षणा बाबत पुनर्विचार व्हायला हवा. त्यासाठी एक बिगर राजकीय समितीची स्थापना करावी', अशी सूचना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. या सूचनेचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध केला आहे. मागासवर्गीयाना आरक्षण मिळू नये हीच भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. त्यांचा हा डाव राष्ट्रवादी काँग्रेस हाणून पाडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आरएसएसचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरूजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याची धडपड संघ करत आहे. 'आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे' हीच त्यांची आधीपासून भूमिका होती. गोळवलकरांचा हाच अजेंडा आता पुढे रेटला जात आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत भाजप नेतेही वेळोवेळी विविध वक्तव्य करत आहेत. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आरक्षणाचा पुन्हा विचार व्हावा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सूत्रबद्ध पद्धतीने आरक्षण संपवून सर्व सामान्यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा डाव आखला जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस संघाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आरक्षण नष्ट करण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. 

मोहन भागवत टप्प्या टप्प्याने आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर दबाव टाकत आहेत. त्यांच्या  रणनीतीचा भाग म्हणूनच समिती स्थापन करण्याचे वक्तव्य सरसंघचालकांनी केल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.   

संबंधित लेख