यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प म्हणजे 'देखेंगे, सोचेंगे, करेंगे' ! - नवाब मलिक

25 Feb 2016 , 05:49:40 PM

यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प हा 'करेंगे, देखेंगे, सोचेंगे' प्रकारचा पूर्णपणे दिशाहीन असा अर्थसंकल्प असून केवळ स्वच्छतेवरच सगळा भर देणारे सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री नसून 'हाऊसकीपिंग मंत्री' आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. 

रेल्वेमंत्र्यांनी आज लोकसभेत सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि सर्वसामान्यांची निराशा करणारा असल्याचे मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 'रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नसली तरी अर्थसंकल्पाशिवाय वर्षभर कोणत्या न कोणत्या छुप्या मार्गाने भाडेवाढ करण्याची भाजप सरकारला सवय आहे. याआधीही फर्स्ट क्लासची भाडेवाढ, तात्काळ तिकिटांच्या किमतीत वाढ, सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ, प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे मलिक म्हणाले. तसेच अर्थसंकल्पात मुंबईला एक दमडीही मिळाली नाही, अशा शब्दांत  नाराजीही त्यांनी व्यक्त केली. 

पश्चिम रेल्वेवर एलिवेटेड कॉरिडॉरसाठी टेंडर काढण्याची तसेच कोस्टल कॉरिडॉरची घोषणादेखील जुन्याच आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे मार्गावर एलिवेटेड रेल्वेची गरज असताना प्रत्यक्षात हार्बर मार्गावर एलिवेटेड कॉरिडॉरची घोषणा केली गेली आहे, या मुद्द्यावरही मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

'दीनदयाळ बोगी' नावाने जनरलचा एक डबा ट्रेनला जोडला जाणार असल्याची घोषणा प्रभूंनी केली, याचाही समाचार मलिक यांनी घेतला. गरीबांसाठी असणारा हा डबा 'दीनदयाळ उपाध्याय' यांच्या नावाने आहे की गरीब, उपेक्षितांवर दया दाखविण्यासाठी हे नाव दिले आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली. 

अर्थसंकल्पात केवळ स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. पण येत्या काळात रेल्वेला नफा-तोटा किती होणार, रेल्वेची पुढची दिशा काय असेल हे यामधून स्पष्ट होत नसल्याने केवळ दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मलिक म्हणाले.

रेल्वे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत ; फक्त वाय- फाय असलेले  बजेट - धनंजय मुंडे 

गेल्या २- ३ वर्षांचे अन् अर्थसंकल्प आणि यावर्षीचा अर्थसंकल्प यात नवीन काहीच नाही. हे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत असून फक्त वाय- फाय देणारे  बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

फक्त प्रस्ताव व प्रयत्न करण्याशिवाय दुसरी एकही मोठी घोषणा बजेट नाही. राज्याचे रेल्वे मंत्री असल्याने महाराष्ट्राला मोठ्या आशा होत्या. मात्र  राज्याला दिलासा देणारी एक ही मोठी बाब अर्थसंकल्पात नाही, किमान काही नवीन रेल्वे तरी सुरु करायला हव्या होत्या तेही यात नाही, एकंदरीत जनतेची निराशा करणाराच हा अर्थसंकल्प असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.रेल्वेमंत्री सपशेल नापास- सचिन अहिर

'मोठ्या अपेक्षेने रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी पुरता अपेक्षाभंग केला आहे', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भाडेवाढ न केल्याबद्दल पाठ थोपटून घेणाऱ्या प्रभूंनी मुंबईसाठी एकही नवी घोषणा केली नाही. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनांनी केलेल्या तब्बल दीडशे मागण्यांनाही प्रभूंनी केराची टोपली दाखवली आहे. मुंबईकरांच्या अपेक्षांच्या कसोटीवर रेल्वेमंत्री सपशेल नापास झाले, असे अहिर यांनी म्हटले.

रेल्वे अर्थसंकल्पात महिलांच्या रोजच्या गरजांकडे दुर्लक्ष- चित्रा वाघ

आजचा रेल्वेचा अर्थसंकल्प हा स्वप्नरंजित अर्थसंकल्प असून महिलांच्या रोजच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. महिला प्रवाशांच्या मूलभूत गरजाही या अर्थसंकल्पात पूर्ण केल्या गेलेल्या नाहीत. मुंबईतील प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विशेष लोकल सुरू केली जाईल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. महिलांच्या सुरक्षेसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. महिलांच्या डब्यातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला सुरक्षेसाठी गार्ड यांचा उल्लेखदेखील अर्थसंकल्पात केला गेला नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.संबंधित लेख