मोदी सरकारमध्ये 'अच्छे दिन' आणण्याची धमक नाही. आगामी निवडणुकांसाठी तयार राहा, सतर्क रहा - शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

27 Feb 2016 , 04:31:39 PM

आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुख नेते, आजी- माजी आमदार, खासदार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर पवार यांनी चर्चा केली.   

"जेएनयुमध्ये 'अभाविप'चा पराभव झाला, म्हणून अभाविपच्या विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. जेएनयुमधील कारवाईचे मंत्री महोदय संसदेत समर्थन करतात हे दुर्दैवी आहे. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मी पाठीशी नाही. पण सगळ्या विद्यापीठाला वेठीस का धरले जात आहे? भाजप फक्त राष्ट्रभक्त आणि बाकी सगळे राष्ट्रविरोधी आहेत, असे भासवले जात आहे. असे झाले तर संघर्षासाठी तयार राहा. जेएनयु प्रकरण एक राजकीय षडयंत्र आहे. देशात वेगळं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण मोदी सरकारमध्ये 'अच्छे दिन' आणण्याची धमक नाही. 

देशातील महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग अस्वस्थ आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी पत्र लिहून विरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास सांगितले. रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांना बाहेर काढले. त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली. आता आमच्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनीही सावध व्हावे. काही केले तर सरकार राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करेल,”
विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा देतांनाच सद्य परिस्थितीवर भाष्य करताना श्री. पवार यांनी केंद्र सरकारवर असे ताशेरे ओढले.
 
'मेक इन इंडिया'मधील गुंतवणुकीसंदर्भातही त्यांनी आज कठोर भाष्य केले. ते म्हणाले, “राज्यातले कारखाने बंद होत आहेत. तर मेक इन इंडियाचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. 'आरटीआय'मार्फत प्रत्यक्षातले आकडे शोधून काढले पाहिजेत. 'मेक इन इंडिया'तली अधिकांश गुंतवणूक मुंबई परिसरात आली. विदर्भातले मुख्यमंत्री असूनही विदर्भात गुंतवणूक आणू शकले नाहीत. विरोधी पक्षात असताना मात्र विदर्भावर अन्याय झाला म्हणून ओरडायचे.

वेगळ्या विदर्भासंदर्भाच्या मुद्द्याच्या रोखाने ते पुढे म्हणाले,
“राज्य एकसंध रहावे अशी माझी इच्छा आहे. वेगळा विदर्भ व्हावा ही विदर्भातील लोकांची इच्छा असेल, तर राष्ट्रवादी आड येणार नाही. पण मूठभर लोकांची इच्छा असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. आणा वेगळ्या विदर्भाचा ठराव... आम्ही पाठिंबा देतो... पाहू या काय होते ते?”
दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदरणीय पवारांनी आपली कळकळ पुन्हा व्यक्त केली. या संदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, “सगळ्या शेतमालाच्या किमती घसरल्या आहेत. शेतकऱ्याला उत्पादन खर्चदेखील मिळत नाही. सबंध शेतकरी वर्ग संकटात आहे. माझ्या सरकारने घेतलेला एक तरी निर्णय या सरकारने घेऊन दाखवावा, मग विचारावे की आम्ही काय केले? कच्च्या तेलापासून सगळ्या वस्तूंच्या किमती खाली आल्या असताना त्याचा फायदा सरकार जनतेला देऊ शकत नाही. 

हिंदू विरूद्ध मुस्लिम, दलित विरूद्ध दलितेतर असे वाद निर्माण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात पाणी नाही. मराठवाड्यातले लोक जगणार कसे? सरकार लोकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. या परिस्थितीत सरकार चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कसा काय घेते? 'गोमातेला वाचवा' म्हणणाऱ्यांना गोमातेलाच द्यायला चारा नाही?”

कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या परिस्थितीवर भाष्य करताना पवार पुढे म्हणाले, “'गर्वसे कहो हम हिंदू है' म्हणत काय सुरू आहे? आपण सतर्क राहिले पाहिजे. पोलिस अधिकाऱ्यावर पानगावला हल्ला झाला हे बरोबर नाही. ठाण्यात महिला पोलिसावर हल्ला होतो. सत्ता येते आणि सत्ता जाते. त्यामुळे सत्ता डोक्यात जाता कामा नये. पण सत्ता शिवसेना-भाजपच्या डोक्यात गेली आहे.”

परमार प्रकरणी बोलताना ते म्हणाले, कोणी दोषी असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. पण परमार यांनी लिहिलेल्या पत्रानुसार ते आर्थिक अडचणीत होते म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवलं तर त्यांना दोषी ठरवून तुरूंगात डांबलं जातंय, हे सुडाचं राजकारण असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचा लेखाजोखा मांडला.
“हरियाणामध्ये भाजप विरोधी पक्षात असताना जाट आरक्षणासाठी आंदोलन झाले होते. आता भाजप आरक्षण का देत नाही? जाट समाजाला आंदोलन का करावे लागत आहे? बिहारमध्ये आणि दिल्लीत भाजपचा पराभव झाला. आगामी केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपचा पराभव होणार, हे मी आताच सांगतो. देशात भाजपची प्रतिमा ढासळत आहे. बिहारचा मतदार जाणकार आहे. किती लाख, कोटी पाहिजेत असे सभांमधून मोदींनी विचारले, पण बिहारची जनता भूलली नाही. पराभव समोर दिसत असल्याने देशात दुहीची किंवा हिंदुत्ववादाची बीजं पेरून भाजप निवडणुकांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहे.”⁠⁠⁠⁠

संबंधित लेख