दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सर्वंकष शुल्कमाफीसाठी अधिवेशनात अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे दंड थोपटणार

01 Mar 2016 , 07:25:25 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शासनाच्या संदिग्ध निर्णयाच्या आड केवळ इबीसी वर्गातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनाच शुल्कमाफी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यापीठ जर निर्णय घेत नसेल, तर या विषयावर अधिवेशनात विधानसभेचे नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दंड थोपटणार आहेत. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीसंदर्भात केलेल्या मोर्चानंतर 'इकोनॉमिक बॅकवर्ड क्लास' मुलांसाठी परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ती सर्वसमावेशक असावी यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले. प्रत्यक्षात इबीसींना शुल्कमाफी देण्यासंदर्भात शासनाचे जे परिपत्रक आहे, ते केवळ शाब्दिक खेळ आहे. ईबीसीमध्ये केवळ ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना फायदा मिळत असून त्यात व्हिजेएनटी, ओबीसी, एसटी हे समाविष्ट होत नाही. मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसंदर्भात विधीमंडळात अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे हे मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आवाज उठवणार आहेत. 

कुलगुरूंनी तुर्तास परीक्षा शुल्क घेणे थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र जर अधिवेशनात शुल्कमाफी मंजुर करून आणलीत, तर आम्ही ती घेणार नाही. मात्र तसे न घडल्यास परीक्षेच्या निकालापूर्वी आम्ही परीक्षाशुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करू, अशी अट कुलगुरूंनी घातली. यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांची बाजू मांडताना विद्यापीठाने पर्यवेक्षकांना आपले एक दिवसाचे वेतन विद्यार्थ्यांसाठी सोडण्यासंदर्भात आवाहन करावे अशा प्रकारची सूचना केल्या. तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षाशुल्कमाफी देण्याकरिता विद्यापीठाला आर्थिक मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उद्योगपतींना साकडंही घालण्यात येणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख