'मेक इन इंडिया' नव्हे 'फेक इन इंडिया' - नवाब मलिक

03 Mar 2016 , 05:33:59 PM

भाजप सरकारचे 'मेक इन इंडिया' हे 'फेक इन इंडिया' असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पुढच्या काळात असे किती 'फेक' एमओयू केले गेले आहेत हे समोर आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहिर केले. गुरुवारी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

'मेक इन इंडिया'च्या नावाने राज्यात २ हजार ५९४ एमओयूंच्या माध्यमातून ८ लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा सरकारने केला आहे. ही गुंतवणूक कोणत्या कंपन्यांनी आणि नेमकी किती रकमेची केली आहे, याची कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही. त्यातच गृहनिर्माण विभागाच्या वतीने १ लाख १२ हजार कोटींचे एमओयू गृहनिर्माण सचिवांच्या स्वाक्षरीने करण्यात आले आहे. हा एमओयू महाराष्ट्र चेंबर हौसिंग इंडस्ट्री बरोबर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एमओयुमध्ये या इंडस्ट्रीच्या कार्यालयाचा ०२२- ४२१२१२०० हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे, मात्र हा क्रमांक सातत्याने 'नॉट रिचेबल' येत आहे. याच कंपनीने पाच वर्षांपूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना परवडणारी घरे बनवण्यासाठी एमओयू केला होता. मात्र त्यांनी त्या पाच वर्षात काहीही केले नाही. त्यामुळे फडणवीस सरकारने 'मेक इन इंडिया'च्या नावाने जबरदस्तीने हा एमओयू केला आहे, हेच दिसून येते. हा खोटा एमओयू असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी केला गेला असल्याचा पर्दाफाश नवाब मलिक यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत मलिक यांनी संबधित एमओयूची कॉपीच सादर करत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

'या कंपनीमध्ये ७० ते ८० बिल्डर असून या एमओयूनुसार ५ लाख घरांची निर्मिती करणार असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. असे असताना ही घरे कशी बांधली जाणार याचे उत्तर सरकारने द्यावे', असे मलिक म्हणाले. शिवाय यातून ७ लाख ६५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, हे रोजगार नक्की कोणाला मिळणार आहेत तेही सरकारने स्पष्ट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआरमध्ये ही घरे बांधली जाणार आहेत. मग त्यासाठी सध्याच्या स्थितीत जागा कुठे आहे, हेही सरकारने सांगावे असे आवाहन त्यांनी केले. 

निवडणुकीत शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या या सरकारला शिवजयंतीला महाराजांचा विसर पडला. एकही जाहिरात सरकारने दिली नाही. मात्र 'मेक इन इंडिया'ची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर देण्यात आली याचीही मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये आठवण करून दिली. यावेळी नवाब मलिक यांच्यासोबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते हेमराज शहा, संजय तटकरे तसेच क्लाईड क्लास्ट्रो हे देखील उपस्थित होते.   

संबंधित लेख