आदरणीय शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान - उद्योगपती राहुल बजाज

24 Oct 2015 , 03:39:15 PM

बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजचा नामकरण सोहळा आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली, माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. Sharad Pawar, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचे आता यापुढे कमलनयन बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नालॉजी असे नामकरण करण्यात आले. त्याआधी आज सकाळी दहा वाजता बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले.
कृषी महाविद्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले व देशाचे अर्थमंत्री या नात्याने आपण त्यात लक्ष घालावे, अशी विनंती अरुण जेटली यांच्याकडे केली. पवार म्हणाले, सध्या ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. पाण्याची कमतरता दिवसेंदिवस भासत आहे. त्यामुळे देशातील साखर उद्योग संकटात आहे. यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत. उसाचा दर व साखरेचा दर यात एकवाक्यता हवी. शेतकऱ्यांना त्यांच्या घामांचा पैसा मिळालाच हवा तरच हा उद्योग टिकेल. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन दीड महिन्यानंतर पाण्याला येणाऱ्या ऊसाच्या वाणाची लागवड केली पाहिजे. हे वाण इंडोनेशियात विकसित करण्यात आले आहे. त्याची मी पाहणी केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घातली आहे. केंद्रातील मोदी सरकारने यावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत कृषिप्रधान देश आहे. देशाच्या जीडीपीत शेती घटकाचा साधारणपणे निम्मा वाटा राहिला आहे. तो तसाच कायम राहिल्यास देशाची प्रगती झपाट्याने राहील, असे पवारांनी सांगितले.
बारामतीत पाहुणे म्हणून आलेल्या या राजकीय व उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद दिला.
आदरणीय शरद पवार यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करीत पाहुण्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
'जेव्हा देशात बारामतीसारखी १०० शहरं उभी राहतील. तेव्हा भारत खऱ्या अर्थानं विकसित होईल.' अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शरद पवार यांच्या बारामतीमधील कार्याची स्तुती केली. विकासाच्या दृष्टीकोनाने पवारसाहेब हे बारामतीचे 'ग्रँडफादर' असल्याचे प्रमाणपत्रही जेटली यांनी दिले. तसेच बारामतीचा दौरा आपल्यासाठी शिकण्याचा चांगला अनुभव आहे, असे सांगत पवारांच्या विविध संस्था व विकास कामाची स्तुती केली.
मा. शरद पवार यांच्या मागणीला जेटलींनी सकारात्मक प्रतिसाद देताना देशाचा विकास व्हावा, हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. शेती व शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल याची आम्हाला कल्पना आहे. पवारसाहेबांनी जे मुद्दे मांडले त्यावर नक्कीच विचार होईल. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान व अनुभव मोठा आहे असेही जेटलींनी सांगितले.
'शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान' अशी पावती प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मा. शरद पवार यांना अनुरोधत दिली. शरद पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचे त्यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केले.

संबंधित लेख