मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा मराठवाडा दौरा दुष्काळी जनतेचा भ्रमनिरास करणारा - धनंजय मुंडे

05 Mar 2016 , 10:30:03 PM

मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील पंचवीस मंत्र्यांनी केलेल्या मराठवाडा दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेला कसलाही दिलासा मिळाला नसून त्यांचा हा दौरा  भ्रमनिरास करणारा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. हा दौरा म्हणजे मंत्र्यांची दुष्काळी टूर आहे, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला. मुख्यमंत्री आणि  इतर मंत्र्यांनी बीड, लातुर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या शुक्रवारी केलेल्या दुष्काळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते परळीत बोलत होते. 

दुष्काळात होरपळून निघणाऱ्या या तीन जिल्ह्यांतील जनतेला आणि शेतकऱ्यांना या दौऱ्यातून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ज्या घोषणा मुंबईत बसूनही केल्या जाऊ शकतात अशा पोकळ घोषणा आणि केवळ जुन्याच योजनांची उजळणी या दौऱ्यात पाहण्यास मिळाली. हा दौरा म्हणजे केवळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पाडलेला एक सोपस्कार ठरला आहे, असे मुंडे म्हणाले. आगामी अधिवेशनात आपण या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण मंत्रीमंडळ आले असतानाही या तीन जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र दुसरीकडे सुरूच होते. यावरूनच जनतेला हे सरकार आधार देणारे वाटत नसल्याची टीका मुंडे यांनी केली. सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच मंत्र्यांना गराडा घातला, मंत्र्यांना जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दिले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

शेतकऱ्यांना या दौऱ्यातून तातडीने दिलासा मिळेल अशी एकही घोषणा झाली नाही. कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, उलट मी काही देण्यासाठी आलो नाही तर योजनांची पहाणी करण्यासाठी आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केल्याचे ते म्हणाले. लातुर सारख्या सर्वाधिक पाणी टंचाईच्या गावासाठी उजनीवरून रेल्वेने पाणी आणण्याबाबत केवळ घोषणा केल्या गेल्या. त्याबाबत दौऱ्यात उल्लेखही नाही. बीड, उस्मानाबाद, परळी, अंबाजोगाई या  नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आगामी तीन महिने तीव्र पाणीटंचाई जाणवणार असताना त्याबाबत साधी चर्चाही होऊ नये, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मुंडे म्हणाले. 

संबंधित लेख