राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

09 Mar 2016 , 08:18:34 PM

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुमारे १३ एप्रिलपर्यंत चालणारे हे अधिवेशन राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांना कर्जमाफी, चारा छावण्या, डान्सबार सुरु करणाऱ्या निर्णय यांसारख्या मुद्द्यांवर गाजणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहीला आहे. अधिवेशनातही या शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रवादी लावून धरणार आहे.   

आज राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनास सुरूवात झाली. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आधुनिक कृषी उद्योगांचे प्रणेते डॉ. भवरलाल जैन, माजी मंत्री निहाल अहमद, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन, रामभाऊ तेलंग, निळकंठ सावंत, बाबुराव चतुर्भुज, वसंतराव झावरे पाटील, झिना वसावे या दिवगंत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर डॉ. भवरलाल जैन यांचा शोक प्रस्ताव आणला गेला. जैन यांच्या शोकप्रस्तावावर श्रद्धांजली व्यक्त करत असतानाच वर्षभरात कर्जबाजारी, नापिकी आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे राज्यात ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याचे स्मरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करुन दिले. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्याप्रतीही परिषदेमध्ये शोकप्रस्ताव व्यक्त करावा, अशी मागणी मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. तसेच आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानपरिषदेत अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील फक्त काही गावांसाठी दुष्काळ जाहीर केला आहे. यावरून पुन्हा एकदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्याप्रती सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दिसून आले असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणात कोणत्याही नव्या घोषणा नाहीत, असे मत व्यक्त केले. अर्थसंकल्प मांडण्याआधी राज्यपालांचे होणारे अभिभाषण हे सरकारच्या येणाऱ्या वर्षातील कृतीचा आराखडा आणि मागच्या वर्षी घेतलेल्या योजनांचा आढावा मांडणारे असते. या पार्श्वभूमीवर जुन्याच योजनांचे नाव बदलून त्या पुन्हा जाहीर करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारने केला आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांसाठी काही नव्या उपाययोजना अभिभाषणात नव्हत्या. राज्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. तसेच संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेच्या कामात मोठे योगदान होते, परंतु संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे नावही सरकारने बदलले आहे, असे तटकरे म्हणाले. संबंधित लेख